दोहा - कतारमध्ये भारतीय नौदलातील ८ माजी अधिकाऱ्यांना अटक केल होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारतीय उच्चायोग कतारच्या उच्चायोगाच्या संपर्कात आहे. कतार सरकारकडून काऊंसलर अॅक्सेस मिळाल्यानंतर आम्ही त्यांची विचारपूस केली आहे. मात्र या अधिकाऱ्यांना कुठल्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे, याची माहिती मिळालेली नाही. आता सरकार या सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे बागची यांनी सांगितले.
कतार पोलिसांनी अटक केलेल्या ८ माजी नौसैनिकांमध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कमांडर पूर्णंदू तिवारी (रि.) यांचाही समावेश आहे. त्यांना २०१९ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सन्मानित केले होते. कंपनीच्या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पूर्णंदू तिवारी यांनी भारतीय नौदलामध्ये अनेक मोठ्या जहाजांची कमांड सांभाळलेली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय उच्चायोग कतारच्या उच्चायोगाच्या संपर्कात आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत या अधिकाऱ्यांना का अटक करण्यात आली आहे याची माहिती मिळालेली नाही. आता या सर्वांना सुरक्षित परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.