रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण, चेन्नईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या नऊ वर्षीय मुलीवर गायीने जीवघेणा हल्ला केला. बुधवारी घडलेली ही घटना कॉलनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक मुलगी तिच्या लहान भाऊ आणि आईसह घराकडे येत आहे, यावेळी एक गाय अचानक तिला शिंगाने उचलून फेकते आणि तिच्यावर हल्ला करते. मुलीची आई तिला वाचवण्याचा आटोकात प्रयत्न करते, पण गाय तिला जवळ येऊ देत नाही. यावेळी इतर काही लोक मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतात, पण गाय इतकी चिडलेली होती की, तिने काही काळ कुणालाही जवळ येऊ दिले नाही.
लोकांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर गाय तिथून पळून जाते. गायीच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चेन्नई कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी मुलीवर हल्ला करणाऱ्या गायींना पकडले असून, पोलिसांनी गायींच्या मालकावर एफआयआर दाखल केला आहे.