UP : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारच्या ऑटोमॅटिक खिडकीत डोकं अडकून एका दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चकिया गावातील रहिवासी रोशन ठाकूर हे त्यांच्या नवीन बलेनो कारच्या पूजेसाठी कुटुंबासह चांदडीह गावातील मंदिरात गेले असता सोमवारी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन ठाकूर आपल्या नवीन वाहनाची पूजा करण्यासाठी मंदिरात गेले होते. यावेळी गाडी सुरू होताच खिडकी आपोआप बंद झाली आणि त्यात बाळाचे डोके अडकले. यामुळे ते बाळ जागीच बेशुद्ध पडले. यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. उभान पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र प्रसाद सिंह यांनी सांगितले की, अद्यापपर्यंत कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांनी चिमुकल्याचे शवविच्छेदन न करता सोमवारी सायंकाळीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
पालकांना इशाराही दुःखद घटना कारमधील ऑटोमॅटिक खिडक्यांच्या धोक्यांवर प्रकाश टाकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पालकांनी लहान मुलांना कारच्या खिडक्यांजवळ एकटे सोडू नये. शिवाय, कारच्या ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाबाबत सावधगिरी बाळगावी.