नवी दिल्ली - दक्षिणेतील एका राज्याचे राज्यपाल लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे अडचणीत आले आहेत. या राज्यपालांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून, या प्रकाराच्या चौकशीस सुरुवात करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे राज्यपाल महोदय राजभवनामध्ये काम करणाऱ्या महिलांवर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप आहे. मात्र गृहमंत्रालयाने सध्या या राज्यपालांची ओळख गुप्त ठेवली आहे. गृहमंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, तपास यंत्रणांना यासंदर्भात काही आदेशही देण्यात आले आहेत. तपासामध्ये या राज्यपालांविरोधात काही चुकीचे आढळल्यास त्यांना त्वरित राजीनामा देण्यास सांगण्यात येईल. मात्र केंद्र सरकारने या प्रकरणी राज्यपालांना समन्स बजावलेले नाही. याआधी गतवर्षी मेघालयच्या राज्यपाल व्ही. संगमुंगनाथन यांच्याविरोधात अशीच तक्रार करण्यात आली होती. तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संगमुंगनाथन यांनी राजभवनाला लेडीज क्लब बनवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी राजभवनातील 100 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे राज्यपालांची शिकार केली होती. संगमुंगनाथन यांनी राजभवनाची गरिमा धुळीस मिळवल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. राज्यपालांच्या परवानगीनेच मुली राजभवनात येत आणि त्यापैकी काही जणी तर राज्यपालांच्या बेडरूमपर्यंत जात असा आरोप करण्यात आला होता. त्याआधी आंध्र प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल एन.डी. तिवारी यांचे अशाच प्रकरणात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते.
धक्कादायक! राज्यपालांवर महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 1:02 PM