मागच्या काही दिवसांमध्ये डीपफेक व्हिडीओ एकापाठोपाठ एक समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफ यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता चक्क उद्योगपती रतन टाटा यांचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. या व्हिडीओमधून ऑनलाइन बेटिंगबाबत संदिग्ध व्यक्तींना फसवलं जात आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रतन टाटा ऑनलाइन बेटिंग कोचला पाठिंबा देताना दिसत आहेत. तसेच आमिर खान नावाच्या एका व्यक्तिच्या टेलिग्राम चॅनेलशी जोडण्याचं आवाहन ते लोकांना करत आहेत.
या रिपोर्टनुसार या फेक व्हिडीओमध्ये रतन टाटा म्हणतात की, लोक मला प्रत्येक वेळी विचारतात की, तुम्ही श्रीमंत कसे झालात? तर मी तुम्हाला माझा मित्र आमिर खान याच्याविषयी सांगू इच्छितो. भारतामध्ये अनेक लोकांनी एव्हिएटर खेळून लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्याचे प्रोग्रॅमर, विश्लेषक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे आभार, यात जिंकण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे.
रतन टाटांसारख्या आदरणीय उद्योगपतींचा डीपफेक व्हिडीओ तयार करून दिशाभूल करण्याच्या या प्रकारामुळे आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यांसाठी डीपफेड व्हिडीओंचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे समोर येत आहे.