बंगळुरु - अलीकडे शिक्षकी पेशाला काळीमा फासणा-या अनेक घटना समोर आल्या आहेत. खरतर शिक्षकांवर समाजाला दिशा देण्याची जबाबदारी असते पण कर्नाटकात काही शिक्षकांनी बिलकुल याउलट कृती केली. शाळेच्या सहलीमध्ये तहानलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावेळी या शिक्षकांनी पाण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या हातात दारुची बाटली दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कर्नाटकाच्या तुमकूर जिल्ह्यातील बोममाला देवीपूरा सरकारी शाळेच्या सहलीमध्ये हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे पाणी मागितल्यानंतर शिक्षकांनी दारु मिसळलेली पाण्याची बाटली विद्यार्थ्यांना दिली. 63 विद्यार्थी, सहा शिक्षक, दोन स्टाफ कर्मचारी आणि दोन आचारी या सहलीला गेले होते. दारु मिसळलेले पाणी प्यायल्यानंतर 18 विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. विद्यार्थ्यांना पोटदुखी सुरु झाली आणि त्यांनी उलटया केल्या.
सहलीवरुन घरी परतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्रास झालेला त्यांनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेविरोधात निदर्शने केली आणि शिक्षण अधिका-याकडे रीतसर तक्रार दाखल केली. संबंधित तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिका-याने शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी केली. त्यांनी विद्यार्थ्यांनाही प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी घडला प्रकार सांगितला. रात्री दारु प्याल्यानंतर शिक्षक पत्ते खेळत होते. तीन शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे असे डीडीपीआय शिवशंकर रेड्डी यांनी सांगितले.