भोपाळ : मध्यप्रदेशातील एका मृताच्या चेहरा व डोळ्यांवर मुंग्या फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस येताच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात सिव्हिल सर्जनसह पाच डॉक्टरांना लगेच निलंबित करण्यात आले आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. भालचंद्र लोधी या ५० वर्षांच्या व्यक्तीला पोटदुखीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पत्नी रामश्री लोधी सोमवारी संध्याकाळपर्यंत सोबत होत्या. मुले लहान असल्याने त्या काल संध्याकाळी घरी गेल्या. त्यांना आज सकाळी फोन आला आणि त्यांच्या पतीचे निधन झाल्याचे कळविण्यात आले. त्या लगेचच हॉस्पिटलमध्ये गेल्या. तेव्हा बेडवर त्यांच्या पतीचा मृतदेह होता. त्यावर चादर वा पांढरे कापडही टाकण्यात आले नव्हते. मृतदेहाच्या चेह-यावर तसेच डोळ्यापाशी मुंग्या फिरत असल्याचे पाहायला मिळाले.
रामश्री लोधी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या, त्याआधीच त्या वॉर्डात डॉक्टर अन्य रुग्णांना तपासून गेले होते. त्यांनाही हा मृतदेह दिसला; पण त्यांनी त्यावर चादर टाकण्याची सूचना दिली नाही. ते तसेच पुढे निघून गेल्याचे सांगण्यात आले. रामश्री लोधी नंतर पतीच्या मृतदेहावरील मुंग्या काढत असल्याचे अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी पाहिले. त्यामुळेच हे प्रकरण उघडकीस आले.