Indians, Blood Pressure: जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील उच्च रक्तदाब रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, 1990 ते 2019 दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. उच्च रक्तदाबाचे रुग्ण 1990 मध्ये 65 कोटींवरून 2019 मध्ये 130 कोटींवर पोहोचले आहेत. त्यापैकी 1 कोटी 80 लाख लोकांचा केवळ उच्च रक्तदाबामुळेच अकाली मृत्यू झाल्याची माहिती आहे. म्हणजेच त्यांचे बीपी नियंत्रणात असते तर आज हे लोक दगावले नसते असे तज्ज्ञांचे मत आहे. भारताबद्दल बोलायचे झाल्यास तब्बल 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी अर्ध्या रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे माहीत नसते. जगातील 30 ते 79 वर्षे वयोगटातील उच्च रक्तदाब रुग्णांपैकी केवळ अर्धे म्हणजे 54% असे आहेत ज्यांना उच्च रक्तदाब असल्याचे माहित आहे. उच्च रक्तदाबावर उपचार घेत असलेल्यांची संख्या 42% आहे. जगात असे फक्त २१% रुग्ण आहेत ज्यांचा रक्तदाब नियंत्रणात आहे.
अहवालात काय आहे माहिती?
- 5 पैकी 4 लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत
- जगातील प्रत्येक 3 पैकी 1 व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण
- 50 टक्के रूग्णांना उच्च रक्तदाब असल्याची माहितीच नसते
- उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, किडनी खराब होण्याचा धोका
WHO च्या 2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 18 कोटी 80 लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. यापैकी ३७ टक्के रुग्णांना त्यांच्या आजाराची माहिती आहे. 30 टक्के उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत. भारतातील केवळ 15 टक्के रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार, जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मरण पावलेल्या लोकांची एकूण अंदाजे संख्या 22% आहे. यापैकी २५% पुरुष आणि १९% महिला असतील.
2019 च्या आकडेवारीनुसार, भारतात 25 लाख 66 हजार लोक हृदयविकाराचे बळी ठरले आहेत. त्यापैकी 14 लाख 51 हजार पुरुष आणि 11 लाख 16 हजार महिला आहेत. 2019 मध्ये भारतात हृदयविकारामुळे झालेल्या 52% मृत्यूंमागे उच्च रक्तदाब हे सर्वात मोठे कारण होते. मरण पावलेल्यांपैकी ५१% पुरुष आणि ५४% महिला होत्या.