नवी दिल्ली - कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच (CAIT) ने दिग्गज ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर गंभीर आरोप केला आहे. अॅमेझॉनच्या वेबसाईटवरून गांजा, मारिजुआनासारख्या पदार्थांची विक्री होणे हा काही पहिला गुन्हा नाही आहे. तर २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्या रसायनाचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता. तेसुद्धा अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरून खरेदी करण्यात आले होते. त्याचाच वापर करून दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोसिव्ह तयार केले, असा दावा CAIT ने केला आहे.
२०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली होती. अॅमेझॉनने दहशतवाद्यांनी खरेदी केलेल्या रसायनांची सविस्तर माहिती तपास यंत्रणांना दिली होती. त्यानंतर अॅमेझॉनच्या मदतीनेच तपास यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांनी अॅमेझॉनवरून भारतात बंदी असलेले अमोनियम नायट्रेड खरेदी केले होते.
CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवार यांनी सांगितले की, एनआयएकडून अटक व्यक्तींची जेव्हा चौकशी करण्यात आली, तेव्हा त्यांनी ही स्फोटके तयार करण्यासाठी अॅमेझॉनवरून आयईडी, बॅटरी आणि अन्य सामान खरेदी केल्याचे मान्य केले. तसेच फॉरेंसिक तपासामध्येही हल्ल्यासाठी बॉम्ब तयार करताना अमोनियम नायट्रेड, नायट्रोग्लिसरिन यांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, आमच्या जवानांविरोधात लढण्यासाठी दहशतवाद्यांनी प्रतिबंधित सामुग्री अमोनियम नायट्रेड ऑनलाईन माध्यमातून सहजपणे खरेदी केले. तसेच त्याचा वापर देशाविरोधात केला. त्यामुळे हे पदार्थ विकणाऱ्या अॅमेझॉनविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही CAITने केली.