नवी दिल्ली - कोणाचं नशीब कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. भटिंडा येथील एका गावात राहणारे रोशन सिंह अनेक दशकांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते. अखेर तब्बल 34 वर्षांनंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. 1988 पासून ते सातत्याने लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहेत. जेव्हा रोशनने लॉटरी तिकिटं विकत घ्यायला सुरुवात केली, तेव्हा कधी-कधी ते थोडेफार पैसे जिंकत असे. मात्र त्यांनी नेहमीच जास्त पैसे जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. यात आपण जे काही पैसे लावत आहोत, ते एक दिवस नक्की वसूल होतील, असा त्यांना विश्वास होता.
रोशनने बीबीसी हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, ते कपड्यांचं दुकान चालवतात. 1987 मध्ये त्यांनी एका दुकानात कामगार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जवळपास 18 वर्षे एका दुकानात काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चं दुकान उघडलं, परंतु यातून फार पैसे मिळत नव्हते. भूमी सर्वेक्षक म्हणूनही त्यांनी काम सुरू केलं. त्यांना आणखी पैसे कमवायचे होते. रोशनची पत्नी लॉटरीची तिकिटे घेण्याच्या विरोधात होती. तिचा नवरा सतत लॉटरीची तिकिटे खरेदी करून केवळ वेळच नव्हे तर पैशाचीही उधळपट्टी करत असल्याचं तिचं म्हणणं होतं.
पत्नीने लॉटरीची तिकिटे खरेदी करण्याच्या व्यसनापासून नवऱ्याला दूर राहाण्याचा सल्ला दिला. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही ती आपल्या पतीला रोखू शकली नाही. शेवटी, तिच्या पतीला त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगली बातमी मिळाली. जेव्हा एका लॉटरी तिकिट डीलरने त्याला फोन करून कळवलं की त्याने पंजाब स्टेट डिअर बैसाखी बंपर लॉटरी 2022 मध्ये 2.5 कोटी रुपयांचे मेगा बक्षीस जिंकले आहे. रोशनला सुरुवातीला वाटलं की त्याचे मित्र मस्करी करत आहेत आणि त्यावर त्याने विश्वास ठेवला नाही.
जेव्हा एजंटने स्पष्ट केलं की तो रामपुरा फूल लॉटरी सेंटरमधून बोलत आहे, तेव्हा रोशनला खात्री पटली. रोशनने बीबीसीला सांगितलं की, "मला आशा होती की मी एक दिवस नक्की जिंकेन. मी किमान 10 लाख रुपये नक्कीच जिंकेन. पण देवाच्या कृपेने मला पहिलं पारितोषिक मिळालं. आम्हाला रात्रभर झोप आली नाही. सर्व कर वजा केल्यावर आम्हाला 1.75 कोटी रुपये मिळतील. देवाने आमची प्रार्थना ऐकली आहे." रोशन लॉटरीचे पैसे वापरून आपल्या तीन मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याचा आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.