Shocking Bengal Blast : पश्चिम बंगालमधील ईग्रा या पूर्व मिदनापूरच्या विभागात एका बेकायदेशीर फटाके निर्मिती कारखान्यात स्फोट झाला. झालेला स्फोट इतका जोरदार होता की कामगारांचे मृतदेह जवळपासच्या दोन तलावात आणि गावाच्या रस्त्यावर उडाले. स्फोटाच्या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेले पोलीस स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह गोळा करताना दिसले. तसेच तलावातूनही मृतदेह काढण्याची मोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नऊ मृतदेहांची ओळख पटली असून आणखी मृतदेह सापडण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
यादरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक अमरनाथ यांनी घटनास्थळी भेट दिली असून, त्या भागातील आयसीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, मात्र स्थानिक नागरिक पोलिसांच्या कारवाईवर नाराज असून त्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
नक्की काय घडलं?
मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत होते. इतर दिवसांप्रमाणेच इग्रा येथील ब्लॉक क्रमांक १ मधील सहारा ग्रामपंचायत क्षेत्रातील खडीकुल गावात कारखाना सुरू होता. दुपारी बाराच्या सुमारास तृणमूल काँग्रेसचे नेते कृष्णपद बाग उर्फ भानू बाग यांच्या बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची चर्चा सुरू झाली. संपूर्ण गावात दहशत निर्माण केल्याने त्यांच्याविरोधात कोणीही बोलण्याचे धाडस दाखवले नव्हते. पण आजच्या स्फोटाने सारं चित्रच पालटले. स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला आणि आजूबाजूला फक्त धूर आणि आग दिसत होती. घटनास्थळीही फक्त आग आणि धूर दिसत होता. तसेच घटनास्थळावरून स्फोटाच्या वेळी चार मृतदेह उडाले आणि तलावात व रस्त्यावर पडले. त्यानंतर एग्रा येथील नागरिकांना दिवसभर तलावातून मृतदेह बाहेर पडतानाच पाहावे लागले.
वेदना, किंकाळ्या अन् आरडाओरडा
स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना विचित्र अवस्थेत मृतदेह पडलेले दिसले. जखमी लोक आक्रोश करत होते. काहींच्या हाता-पायाला गंभीर इजा झाली होती तर काही लोक चक्क उडून तलावात पडले होते. सर्वत्र वेदना आणि किंकाळ्यांचा आवाज ऐकू येत होता. सगळीकडे फक्त आरडाओरडा सुरू होता. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, घराच्या छतावरून मृतदेह खाली पडून तलावात पडले.
या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या नऊ गाड्यांच्या सहाय्याने आग विझवण्यात आली.