हल्लीच्या काळात मुलांचं शिक्षण हा अनेक पालकांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. त्यामधून अनेक पालक हे आपल्या मुलांवर अभ्यासासाठी दबाव आणताना दिसतात. दरम्यान, दोन्ही मुलगे अभ्यासात कमी पडत असलेल्या एका पित्याने त्यांची हत्या करून नंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशमधील काकीनाडा येथे हा भयंकर प्रकार शुक्रवारी रात्री घडला.
व्ही. चंद्रशेखर असे आपल्या दोन मुलांची हत्या करणाऱ्या पित्याचं नाव असून, त्याने त्याच्या अनुक्रमे सात आणि सहा वर्षांच्या मुलांचा बादलीत बुडवून जीव घेतला. ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी पित्याने मुलांची अभ्यासातील असमाधानकारक प्रगती पाहून निराश होऊन त्यांना एका बादलीत बुडवले आणि त्यांचा जीव घेतला. त्यानंतर स्वत:ही बेडरूममध्ये गळफास लावून जीवन संपवले. जेव्हा पत्नी घरात पोहोचली तेव्हा पतीला गळफास घेतलेल्या स्थितीत आणि मुलांना बेशुद्धावस्थेत पाहून तिला धक्का बसला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपली मुलं अभ्यासात कच्ची राहिली तर त्यांना भविष्यात संघर्ष करावा लागेल आणि ते या स्पर्धेच्या युगात मागे पडतील, अशी भीती व्ही. चंद्रशेखर याला वाटत होती. त्याच भीतीमधून मानसिक दबावाखाली येत त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली असून, पोलिसांनी ती ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहेत.