राजस्थानमधील बीकानेर जिल्ह्यातील डॉ. तनवीर मालावत पॅरामेडिकल इन्स्टिट्युटने आपल्या विद्यार्थ्यांना एक धक्कादायक आदेश दिला आहे. कॉलेजच्या प्राचार्यांनी राज्यपालांच्या कार्यक्रमास न आल्यास संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे. तसेच यासाठीची सगळी जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्यांची असेल, असेही या आदेशात म्हटले आहे.
प्राचार्यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेला हा लेखी आदेश राज्यपाल कलराज मिश्र यांच्या कार्यक्रमामासाठी गर्दी जमवण्याच्या उद्देशाने काढण्यात आला आहे. या आदेशामध्ये म्हटलं आहे की, सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येतं की, ७ जून रोजी वेटनरी कॉलेज ऑडिटोरियममध्ये राज्यपाल कलराज मिश्र दुपारी बीकानेर येथे येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेज युनिफॉर्म, कॉलेज आयडी आणि नेमप्लेट लावून उपस्थित राहावं. जो कुणी विद्यार्थी या कार्यक्रमास अनुपस्थित राहील, त्याला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही, याची जबाबदारी त्याच विद्यार्थ्यावर असेल.
पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संध्याकाळी रेडक्रॉस सोसायटीकडून नशेविरुद्धच्या अभियानाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल कलराज मिश्र हे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र या कार्यक्रमापूर्वी प्राचार्यांनी पाठवलेलं हे पत्र चर्चेचा विषय ठरलं आहे.