नैनिताल - देशभरात कोरोना संकटाने हाहाकार माजला असून रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगाचा लागल्या आहेत. त्यातच, आशादायी चित्र म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, उत्तराखंडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून बालकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. उत्तराखंडमध्ये 9 वर्षांपेक्षा कमी वयाचे 1000 मुले कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत. या मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उत्तराखंडमधील ग्रामीण भागातही कोरोनाचा मोठा शिरकाव होताना दिसत आहे. गावातील मृत्यूदरही वाढला असून नैनितालमधील एका गावात गेल्या दोन आठवड्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात प्रति 1 लाख लोकांमागे 771 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. उत्तराखंडमध्ये 79,379 कोरोना व्हायरसचे एक्टीव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 4426 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील रुडकीच्या एका गावात 2 आठवड्यांत 30 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गावातील काही लोकांना ठार मारण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल, आरोग्य आणि पोलीस विभागाच्या पथकाने गावात धाव घेतली आहे. मात्र, रुडकीचे प्रशासकीय जिल्हाधिकारी यांनी हे वृत्त फेटाळले असून आमच्याकडे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची अधिकृत आकडेवारी नाही, कदाचित इतर आजाराने हे मृत्यू झाले असतील, असे त्यांनी म्हटलंय.
उत्तराखंडमधील ग्रामीण आणि डोंगराळ भागातच कोरोनाचे मोठे संकट दिसून येत आहे. नैनीताल जिल्ह्यातील ओखलकांडा ब्लॉकच्या कूकना आणि घैना या गावात 14 लोकं कोरोना संक्रमित झाले आहेत. विशे, म्हणजे एकूण 20 लोकांची चाचणी केली होती, त्यापैकी 14 जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. गावात लग्न समारंभ आणि इतरही कार्यक्रमात लोकांच्या उपस्थितीवर रोख ठेवण्यात आलाय.