जयपूर : एकीकडे तबलिगी जमात, बॉलिवूड सिंगर कनिका कपूर सारख्या लोकांवर निष्काळजीपणाचा आरोप होत असताना आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनही तोच कित्ता गिरवला जात आहे. एका सरकारी हॉस्पिटलच्या लॅब टेक्निशिअनने मुलगा झाला म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत लाडू वाटल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले होते. आता असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यामध्ये घडला आहे.
झुंझुनू जिल्ह्यातील चिडावाचा एक तरुण हरियाणाच्या फरीदाबादमधील एका हॉस्पिटलमध्ये काम करतो. त्याचे आणि त्याच्या भावाची फरीदाबादमध्ये २९ एप्रिलला कोरोना चाचणी करण्यात आली. पुढच्याच दिवशी म्हणजे ३० एप्रिलला दोघे भाऊ चिडावाच्या मूळ गावी आले. या दोघांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे रात्री उशिरा समजताच दोघेही फरार झाले. धक्कादायक म्हणजे या दोघांना फरीदाबादमध्येच होम क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोघांनी थेट घर गाठले. आता प्रशासनाच्या त्यांना शोधताना नाकीनऊ आले आहेत. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना क्वारंटाईन सेंटरला पाठविण्यात आले आहे.
राजस्थानच्या ३३ पैकी २९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर अजमेरमध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह जवळपास १ तास हातगाडीवर हॉस्पिटलबाहेर पडून होता. त्याच्या आसपासही कोणी फिरकेना, शेवटी आरोग्य प्रशासनाने दुपारी १२.३० वाजता हा मृतदेह शवागरात ठेवला. आता या घटनेला २४ तास उलटले आहेत. तरीही त्याच्यावर अंतिम संस्कार कसे करावेत, याबाबतही निर्णय होत नसल्याची शोकांतिका आहे.
राजस्थानमध्ये आज २४ तासांत ६० जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जोधपूर २७, जयपूर १७, उदयपूर ५ आणि अन्य ठिकाणी दोन-एक असे रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा २८३२ वर गेला आहे. तर आतापर्यंत मृत्यूंची संख्या ७१वर गेली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
लॉकडाऊन वाढला! तुमच्या कारने मेन्टेनन्सला नाही दमवले म्हणजे मिळवले