नवी दिल्ली- छावला भागातल्या एका गोशाळेत गेल्या दोन दिवसांपासून संशयास्पदरीत्या 36 गायींचा मृत्यू झाला आहे. प्राण्यांचे डॉक्टर आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, घटनेचा तपास सुरू आहे. शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता पोलिसांनी याची माहिती दिली आहे. 1400 गायी असलेल्या गोशाळेत 36 गायी आजारी होत्या. डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी केली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात गाई असल्यानं गोशाळेत स्वच्छता होत नव्हती. तसेच गायींना वेळेवर चारा दिला जात नसल्याचंही समोर आलं आहे. पावसाच्या दिवसांत गोशाळेत स्वच्छता करणं गरजेचं आहे. गोशाळेत अस्वच्छता असल्यानं गायी आजारी पडू लागल्या आहेत. गायींच्या मृत्यूला तपासात अस्वच्छता हे प्राथमिक कारण देण्यात आलं आहे. गोशाळा 20 एकरांमध्ये पसरलेली असून, ही गोशाळा ट्रस्टच्या माध्यमातून चालवली जाते.गेल्या काही दिवसांपासून गोशाळेतील मोटारमधून अशुद्ध पाणी येत होतं. सर्व मृत गायीचं शवविच्छेदनही केलं जाणार आहे. तपासाचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
धक्कादायक! दिल्लीतल्या गोशाळेत संशयास्पदरीत्या 36 गायींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 5:01 PM