नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारी पातळीवरही खूप प्रयत्न करण्यात आले. खासगी लॅबना याची परवानगी देण्यात आली; परंतु काही लॅब्सनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी उकळल्याचे प्रकार समोर आले. आता तर उत्तर प्रदेशातील एका लॅबने ३५ जणांना निगेटिव्ह असताना कोरोनाबाधित असल्याचा अहवाल देऊन त्यांच्या जिवाशी खेळ केल्याचे समोर आले आहे.
या प्रकारची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने संबंधित लॅबचा परवाना रद्द केला आहे; तसेच चाचणीतील गोंधळाबद्दल ५ लॅबना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. काही लोकांना ताप, सर्दी असा त्रास होऊ लागला होता. अशात डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. खासगी लॅबने तपासणीनंतर ३५ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दिला. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे, या अहवालामुळे त्यांना काही दिवस कोरोनाबाधित रुग्णासोबत आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे आता त्यांना संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.या सर्व ३५ जणांनी नंतर सरकारी लॅबमध्ये तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे उघड झाले, त्यामुळेच खासगी लॅबने केलेला संतापजनक गलथानपणा उघडकीस आला. याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने या लॅबचा परवाना तात्पुरता रद्द करून, या गोंधळाची चौकशी सुरू केली आहे.