लखनऊ, दि. 28- लखनऊमधील लोहिया हॉस्पिटलमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया संयुक्त हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री कुत्र्यांनी एका महिलेचा मृतदेह छिन्हविछिन्ह केला. रविवारी सकाळी महिलेचं कुटुंबिय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर हा संपूर्ण प्रकार उघड झाला. मृत महिलेच्या कुटुंबियांनी त्या महिलेच्या शरीरावरील सोन्याचे दागिने गहाळ झाल्याचा आरोपही केला आहे. आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे.
चिनहटचे रहिवासी असणाऱ्या विनोद तिवारी यांनी सांगितलं,'त्यांची पत्नी पुष्पा तिवारी (40) यांना शनिवारी पोटात दुखत असल्याने सकाळी साडेनऊ वाजता लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पुष्पा यांनी विष खाललं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणूनच पोस्टमार्टेमनंतर पुष्पाच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह दिला जाणार होता. यासाठी पुष्पा यांचा मृतदेह हॉस्पिटलमधील शवगृहात ठेवण्यात आला होता.
रविवारी सकाळी जेव्हा पुष्पा यांचं कुटुंबिय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचलं तेव्हा खोलीच्या बाहेर सगळीकडे रक्त पसरलं होतं. खोलीचा दरवाजा उघडून आत गेल्यावर त्यांना पुष्पा यांचा मृतदेह छिन्हविछिन्ह अवस्थेत दिसला. चेहऱ्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. तसंच दोन्ही डोळे गायब होते. संपूर्ण खोलीमध्ये कुत्र्यांच्या पायाचे ठसे पाहायला मिळाले. पुष्पा यांच्या गळ्यात सोन्याची चेन, पायात पैजण, नाकात सोन्याची चमकी तसंच कानातलेसुद्धा होते, असा आरोप पुष्पा यांच्या कुटुंबियांनी केला आहे. रविवारी जेव्हा आम्ही मृतदेह घेण्यासाठी गेलो तेव्हा या सगळ्या वस्तू गायब होत्या, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
पुष्पा यांचा मृतदेह शवगृहात ठेवल्यानंतर शवगृहाला कुलूप लावण्यात आलं होतं. कोणीतरी रात्री दरवाज्याचं कुलूप तोडलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला, असं लोहिया हॉस्पिटलचे निर्देशक डॉ.डी.एस.नेगी यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी अगुआईमध्ये कार्डिओलॉजिस्ट डॉ.बी.आर जैसवाल, फिजीशिअन डॉ.एस.के.श्रीवास्तव, डॉ.शैलेश श्रीवास्तव यांची टीक करेल, असंही डॉ.नेगी म्हणाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी वॉर्डबॉय इस्लाम, गार्ड पवन मिक्षा, सुपरवाइजर आशिष आणि अनिल यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. या चौघांच्या विरोधात चोरीची तक्रार हॉस्पिटलकडून दाखल करण्यात आली आहे.