जयपूर - राजस्थानमधील सेशन कोर्टमध्ये असलेल्या तुरुंगातच सराईत गुन्हेगारांनी भुयार खोदल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बदमाशांनी राज्यातील सर्वात मोठ्या सेशन्स कोर्टाच्या आवारात असलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ही भुयारं खोदली आहे. ही भुयारं रातोरात खोदण्यात आल्याची शक्यता असून, त्या माध्यमातून कुठल्यातरी हायप्रोफाइल गुन्हेगाराला सोडवण्याचा कट शिजत होता, अशी चर्चा आहे. मात्र वेळीच याची माहिती पोलिसांना मिळाल्याने कैद्यांना तिथे आणले गेले नेही. दरम्यान, पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही भुयारं खोदण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आता पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयपूरचं सेशन कोर्ट हे राजस्ठानचे सर्वात मोठं सेशन कोर्ट आहे. येथे सुमारे २० हजार वकील प्रॅक्टिस करत असतात. त्यामुळे येथे दिवसभर वर्दळ आणि पोलिसांची ये जा असते. तेथील सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट असल्याचे मानले जाते. मात्र या कडेकोट सुरक्षेत सोमवारी असं चित्र समोर आलं. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडाली.
जयपूरच्या सेशन्स कोर्ट परिसरात असलेल्या तात्पुरत्या तुरुंगामध्ये रातोरात भुयार खोदण्यात आले. हे भुयार तुरुंगाच्या बाहेरील खोलीपासून कोठडीच्या आतील टाइल्स पर्यंत खोदण्यात आलं होतं. मात्र टाइल्स उचलण्यात आली नव्हती. सोमवारी सकाळी जेव्हा पोलीस खात्यातील दोन जवान कैद्यांना तुरुंगात आणण्यासाठी पाहणी करत होते. तेव्हा तुरुंगाच्या भिंतीजवळ खोदलेलं हे भुयार त्यांच्या नजरेत आलं.
दरम्यान, या घटनेनंतर कैद्यांना सेंट्रल जेलमध्ये आणणे रद्द करण्यात आले. कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी वेगवेगळ्या तुरुंगातून आणण्यात येते. त्यांना कोर्टात हजर करेपर्यंत या तात्पुरत्या तुरुंगातील कोठड्यांमध्ये ठेवले जाते. मात्र मात्र तुरुंगात भुयार असल्याचे समजताच खळबळ उडाली. प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. तसेच भुयाराच्या तोंडावर दगड ठेवून ते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. समोर आलेले व्हिडीओ आणि फोटोंमधून हे भुयार सुमारे ५ फूट खोल असल्याचे दिसत आहे.