बंगळुरू - ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्यासहीत आणखी काही नामवंतही होते. ही धक्कादायक माहिती तपास अधिकाऱ्यांनीच दिली. गिरीश कर्नाड यांच्याबरोबरच साहित्यिक बी. टी. ललिता नाईक, निदुमामिदी मठाचे स्वामी वीरभद्र चन्नमल्ला, पुरोगामी विचारवंत सी. एस. द्वारकानाथ यांच्यावरसुद्धा त्या आरोपींचा निशाणा होता अशी माहिती तपासात समोर आली आहे
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने पराशुराम वाघमारे, के. टी. नवीन ऊर्फ होटे मांजा, अमोल काळे, मनोहर येडवे, सुजीत कुमार ऊर्फ प्रवीण, अमित देगवेकर या सहा जणांना अटक केलेली आहे. लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या बंगळुरुतील घराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या मारेकऱ्यांच्या हालचालीच्या कैद झाल्या होत्या. मारेकऱ्यांना दोनवेळा गौरी लंकेश यांच्या घराची रेकी केली होती, असं सीसीटीव्हीत दिसलं होतं. दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 वाजता हल्लेखोरांनी लंकेश यांच्या घराची रेकी केली होती. रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी लंकेश घरी आल्या. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला.