रांची - झारखंडच्या साहिबगंज येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने घराच्या दोन मजली इमारतीवरुन पाच चिमुकल्यांना फेकून दिले. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह एक युवक जखमी झाला आहे. या महिलेने लहान मुलांना गोडीगुलाबीने इमारतीच्या छतावर नेले, त्यानंतर एक-एक करुन पाच जणांना छतावरुन खाल फेकून दिले.
बिहारी लाल मंडल भवन येथे शेजारील काही लहान मुले टीव्ही पाहत होते. त्यावेळी, घरातील एका महिलेने मुलांना छतावर नेले आणि तेथून खाली फेकून दिले. सुदैवाने तेथील काही महिलांच्या पुढाकारामुळे ही मुले वाचली. बुधन मंडल आणि शर्मिला नावाच्या महिलांने या मुलांवर झडप घालून त्यांना पकडले. त्यामुळे, या चिमुकल्यांचा जीव वाचला. मात्र, अंश कुमार मंडल (१२), आयुष कुमार (१०) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर, मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केलेल्या बुधन मंडल याही जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी माहिती मिळताच एसडीपीओ विजय आशीष कुजूर आणि नगर पोलीस ठाण्याचे एएसआय प्रमोद कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. त्यावेळी, संबंधित महिला मानसिक आजाराने ग्रस्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यातूनच तिच्याकडून हा प्रकार घडल्याचे पोलिसांना समजले.