मुंबई - देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकारने अनलॉक आणि राज्य सरकारने मिशन बिगेन अगेनचा नारा देत सर्व व्यवहार पूर्णपणे सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. मात्र, दुसरीकडे लोकांची वर्दळ वाढल्याने आणि गर्दीमुळे कोरोनाचा पसार होताना दिसत आहे. देशात दिवसाला जवळपास 1 लाखांच्या घरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर, राज्यात दिवसाला 20 ते 25 हजारांच्या घरात रुग्णसंख्या पोहोचत आहे. त्यामुळे, रुग्णांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.
राज्यासह देशातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना बेड मिळेना झालाय, तर कुठे रुग्णांसाठी ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे, सरकारविरुद्ध सर्वसामान्यांच्या मनात तीव्र संताप आहे. डॉक्टरांकडून होणाऱ्या मानहानीच्याही अनेक तक्रारी समोर येत आहेत. गुजरातमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि खासदार राजीव सातव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, पीपीई किट परिधान केलेली व्यक्ती, कोरोनाबाधित रुग्णाच्या छातीवर लाथा मारत असल्याचा दावा सातव यांनी केला आहे.