मागच्या काही दिवसांपासून देशभरातून महिला अत्याचारांबाबतच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. दरम्यान, आता आंध्र प्रदेशमधून असाच एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका इंजिनियरिंग कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरा सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका तरुणीची नजर या कॅमेऱ्यावर पडली. त्यानंतर तिने याबाबतची माहिती हॉस्टेल व्यवस्थापनाला दिली होती. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले काही व्हिडीओ मुलांच्या हॉस्टेलमध्येही शेअर झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नाराज असलेल्या विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केलं आहे.
याबाबत मिळाललेल्या माहितीनुसार ही घटना आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यात घडली आहे. येथील गुडलवालेरू कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधील गर्ल्स हॉस्टेलमध्ये हिडन कॅमेरा लावण्यात आलेला होता. याबाबतची माहिती मिळताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या परिसरात घोषणाबाजी सुरू केली. हे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, आंदोलनाला तोंड फुटताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला तातडीने सुरुवात केली. तसेच इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कॉलेज प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांना या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीचं आश्वासन दिलं आहे. तसेच कॉलेज प्रशासन या प्रकरणी तपासासाठी अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करत आहे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाईल, असं आश्वासनही कॉलेज प्रशासनानं दिलं आहे.