सागर : लहानपणी वडीलधारे म्हणायचे बिया गिळू नका नाहीतर डोक्यावर झाड उगवेल, टक्कर देऊ नका नाहीतर शिंग उगवेल. मात्र, आजपर्यंत कोणाच्या डोक्यावर झाड उगवल्याचे किंवा शिंग आल्याचे ऐकिवात नव्हते. मात्र, ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. मध्यप्रदेशच्या एका व्यक्तीला खरेखुरे शिंग उगवले आहे.
सागर जिल्ह्यातील पटना बुजुर्ग गावातील श्यामलाल यादव (74) या वृद्धाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांच्या डोक्याच्या मधोमध 4 इंचाचे शिंग उगविले आहे. डॉक्टरांना आधी मस्करी वाटत होती. मात्र, तपासले असता त्यांनाही धक्का बसला. काही दिवसांपूर्वीच यादव यांच्यावर शस्त्रक्रिया करून शिंगापासून मुक्त केले आहे. शामलाल गेल्या पाच वर्षांपासून हे शिंग घेऊन फिरत होते. त्यांना शिंगाचा त्रास होत नसला तरीही अस्वस्थ वाटत होते.
श्यामलाल यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यानंतर काही दिवसांनी त्या जागी शिंग उगवायला सुरूवात झाली. अनेक डॉक्टरांना दाखविले, मात्र काही फायदा झाला नाही. यानंतर स्थानिक न्हाव्याने शिंग ब्लेडने कापले होते. मात्र, तरीही शिंग उगवत होते. भोपाळ आणि नागपुरच्या हॉस्पटलमध्येही दाकविले, काही फायदा झाला नाही. विश्वास ठेवण्यासारखा डॉक्टर भेटला नाही.
यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉ. विशाल गजभिये यांना दाखविले. गजभिये यांनी शस्त्रक्रिया करून शिंग मुळापासून काढून टाकले. गजभिये यांनी सांगितले, सीटी स्कॅन करून शिंगाचा आकार पाहिला. मेंदूमध्ये किती खोलवर हे शिंग आहे ते समजले. शिंगाची लांबी 4 इंचाची होती आणि जाडीही मोठी होती. जेव्हा मेंदूपासून शिंग दूर असल्याचे समजले तेव्हा न्यूरोसर्जनची गरज नसल्याचे ठरविले. यानंतर ऑपरेशन करण्यात आले. शिंग काढल्यानंतर डोक्यावर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली. आता हे शिंग पुन्हा उगवणार नाही.
मेडिकल सायन्समध्ये याला सेबेसियस हार्न म्हटले जाते. हा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. हे प्रकरण वैद्यकीय अभ्यासासाठीही पाठविण्यात येणार आहे. तसेच मेडिकल जर्नलमध्येही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे गजभिये यांनी सांगितले.