वाराणसी - कोरोना महामारीच्या संकटात अनेकदा माणूसकीचा आदर्श निर्माण करणारी उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. तर, कुठे माणूसकीला काळीमा फासणाऱ्याही घटना घडल्या आहेत. कधी मेडकिल वाल्यांकडून, कधी डॉक्टरांकडून, कधी इतर सेवा पुरविणाऱ्यांकडून अशा घटना घडल्याचं आपण पाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात वाराणसीमधील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. लहान मुलाच्या उपचाराबाबत रुग्णालयाकडून निष्काळजीपणा केल्याचं समोर आलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा मोठ्या तुटवड्याचा सामना आपणास करावा लागला आहे. आता तिसऱ्या लाटेपूर्वी काळजी घेण्यात येत आहे. वाराणसीमध्येही तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता घेऊन, शासन आणि प्रशासन तयारीला लागले आहे. मात्र, दुसऱ्या लाटेतच लहान बाळावरील उपचारासाठी बीएचयू रुग्णालयाने निष्काळजीपणा केला आहे. येथील एका 10 दिवसांच्या बाळाला रुग्णालयात बेड नसल्याचे कारण देत दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.
रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बाळासह कुटुंब रुग्णालयातील बेडसाठी भटकंती करत राहिले. मात्र, येथेही व्हेंटीलेटर नसल्याचे कारण देत त्यांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले. मात्र, बीएचयू रुग्णालयातच लहान मुलांसाठीचे बेड आणि ऑक्सिजन रिकामे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयात एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड रिकामे असतानाही प्रशासनाने या बाळास परत पाठवले. सैदपूरच्य महमदपूर येथील शशीभूषण यादव यांच्या बाळाचा जन्म सैदपूरच्या एका रुग्णालयात झाला होता. येथे बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे डॉक्टरांनी वाराणसी येथील खासगी रुग्णालयात रेफर केलं.
शशीभूषण आपल्या भावासह या लहान मुलास घेऊन महावीर मंदिरजवळील रुग्णालयात पोहोचले. मात्र, तेथेही रुग्णास बीएचयू येथे रेफर करण्यात आले. त्यावेळी, बीएचयू येथे या चिमुकल्यास घेऊन त्याचे कुटुंबीय पोहोचले. प्राथमिक तपासणी करुन काही औषधेही देण्यात आली. मात्र, अर्ध्या तासानंतर रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याचे सांगत बाळासह त्याच्या वडिलांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले. विशेष म्हणजे बीएचयू रुग्णालयातूनच ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले, जे रिक्षात लावून कुटुंबीय बेडसाठी दुसरीकडे भटकले.
बीएचयू रुग्णालयात बेड रिकामे असतानाही बाळासह कुटुंबीयांना परत पाठवल्याची घटना एम.एस. केके. गुप्ता यांना मिळाली. त्यानंतर, गुप्ता यांनी संबंधित अधिकारी व स्टाफची चौकशी करुन माहिती घेतली. त्यावेली, रुग्णालयात बाळासाठीचे बेड शिल्लक असल्याचे समजले. त्यामुळे, जवळपास तीन तासानंतर पुन्हा बीएचयू रुग्णालयातच बाळाला बेड उपलब्ध झाला.