अमृतसर : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचा काही जण फायदाही उठवत आहेत. एका पाकिस्तानी युवकाने पत्नीपासून सुटका करण्यासाठी तिला चक्क पाक रेंजर्सच्या मदतीने भारतीय सीमेवर ढकलले. बुधवारी पहाटे कोणीतरी घुसखोरी करत असल्याचे दिसताच बीएसएफच्या जवानांनी गोळीबार केला. यामध्ये ही महिला जखमी झाली असून जवानांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
ही महिला सीमारेषा पार करून भारतात घुसली होती. यावेळी अंधारामध्ये जवानांना हालचाल जाणवली म्हणतून त्यांनी जागेवरच थांबण्याचे आदेश दिले. मात्र, ती न थांबताच आतमध्ये येत राहिली. यामुळे बीएसएफच्या जवानांनी गोळ्या झाडल्या. या गोळ्या लागल्याने ती जागेवरच कोसळली होती. प्रकाश पसरू लागल्यावर जवानांनी तिचा शोध घेतला असता ती महिला असल्याचे समजले.
हेरगिरीसाठी पाठविल्याचा संशयया महिलेचे मानसिक संतुलन ठीक असून हेरगिरीसाठी पाकिस्तानने पाठविले असेल अशा शक्यतेनेही तपास सुरु करण्यात आला आहे. तिला जेव्हा जवानांनी विचारले तेव्हा तिने आपल्याला नवऱ्याने सुटका व्हावी म्हणून जबरदस्तीने भारतीय सीमेवर पाठविल्याचे सांगितले. तसेच यासाठी तिच्या पतीने पाकिस्तानी रेंजर्सशी संधान साधले होते. भारतीय हद्दीत जाण्यासाठी रेंजर्सनीही दबाव आणल्याचे या महिलेने सांगितले.
डीआयजी राजेश शर्मा यांनी सांगितले की, सर्व बाजुंनी चौकशी सुरु आहे. तिच्याजवळ एक तुटलेला मोबाईल सापडला आहे. उपचारानंतर या महिलेला डेरा बाबा नानक पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. बीएसएफची तुकडी 10 यांच्यांतर्गत येणाऱ्या भागामध्ये ही महिला घुसली होती. धुके असल्यामुळे जवान तिला पाहू शकले नाहीत. मानवी बॉम्ब असल्याच्या शक्यतेने जवानांनी गोळी झाडली.
गुलशन (32) असे या महिलेचे नाव असून तिने सांगितले की ती पाकिस्तानी आर्मी कॅम्पमधून आलेली आहे. एलओसीवरील ताजपुरा गावामध्ये राहते. तिचा पती तिच्यापासून सुटका करून घ्यायच्या प्रयत्नात होता. तीन दिवसांपूर्वी पाक लष्करासोबत पतीने हात कट रचला होता. अंधार असल्याने रेंजर्सनी सीमारेषेवर ढकलून दिले.