चंदीगड: पंजाबच्या लुधियानामध्ये मंगळवारी रात्री उशिरा एक धक्कादायक दुर्घटना घडली. येथील टिब्बा रोडवरील महापालिकेच्या कचरा डंप यार्डजवळ बांधलेल्या झोपडपट्टीला लागलेल्या एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. 19 एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तातडीने आग विझवली आणि झोपडीतून 7 मृतदेह बाहेर काढले. या अपघातात जीव गमावलेले कुटुंब हे परप्रांतीय मजूर असून, ते दुणे रोडवरील महापालिकेच्या कचरा डंप यार्डजवळ एका झोपडीत राहत होते.
पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून, मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या पाच मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. सुरेश साहनी (55), पत्नी अरुणा देवी (52), मुली राखी (15), मनीषा (10), गीता (8), चंदा (5) आणि सनी (2) अशी मृतांची नावे आहेत. परप्रांतीय कुटुंबातील मोठा मुलगा राजेश हा मित्राच्या घरी झोपायला गेल्याने तो या अपघातात बचावला. राजेशनेच त्याच्या कुटुंबीयांची माहिती पोलिसांना दिली.
पूर्व लुधियानाचे सहायक पोलिस आयुक्त सुरिंदर सिंग यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले. डीसी सुरभी मलिक आणि पोलिस आयुक्त कौस्तब शर्माही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्व मृतदेह झोपडीतून बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. झोपडीला आग कशी लागली, हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. कुटुंब झोपले असताना कोणीतरी झोपडपट्टीला आग लावल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.