गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये इंदिरापुरम पोलीस स्टेशन हद्दीतील कानवानी परिसरात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याठिकाणी वसलेल्या झोपडपट्ट्यांना अचानक आग लागली. त्यामुळे लोकं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी धावपळ करू लागली. यात आगीमुळे चेंगराचेंगरी झाली. एवढेच नाही तर ही आग शेजारील गोठ्यातही पसरली. अनेक गायीही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. बर्याच गायींचाही जळून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आगीची बातमी कळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपड्यांमधील एका सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. त्या शेकडो घरं आगीत जळाली. आगीतून जीव वाचवण्यासाठी लोकं सैरावैरा पळू लागले. याठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीतही अनेकजण जखमी झाले. या आगीत मुक्या जनावरांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेबाबत श्रीकृष्ण गोसेवाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की, झोपडपट्ट्यांमध्ये लागलेल्या आगीमुळे ही आग शेजारील गोठ्यात पसरली. त्याठिकाणी १०० हून अधिक गायींचा जळून मृत्यू झाला. या सर्व गायी दूध न देणाऱ्या होत्या. तर दुसरीकडे अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहचल्या. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु मोठ्या संख्येने झोपडपट्टी असल्याने आग पसरत चालली आहे. त्यात भंगाराचं सामान अधिक असल्याने आग फैलावतेय. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर जमा झालेला आहे.