नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बागेत खेळण्यासाठी गेलेली साडेचार वर्षांची मुलगी मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडल्याची भयंकर घटना समोर आली आहे. चिमुकली बागेतून बाहेर येऊन समोरील मिठाईच्या दुकानाकडे गेली आणि तिथल्या उकळत्या पाण्यात पडली. जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिच्यावर पाच दिवस उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी झुंज आता अपयशी ठरली आहे. पाच दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. अंकिता असं या मुलीचं नाव होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व मिदनापूरमधील कोलाघाट पोलीस ठाण्याच्या मेचेडा चिल्ड्रन पार्क भागात ही घटना घडली आहे. विद्यासागरपल्ली, शांतीपूर येथे मुलीचे तिचे घर आहे. तिच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या मिठाई दुकानाची तोडफोड केली. एका मिठाईच्या दुकानासमोर उकळत्या पाण्याचे भांडे पडले होते. त्या भांड्यातील उकळत्या पाण्यात चिमुकली चुकून पडली. दुकानमालकाने तिच्याकडे लक्ष न गेल्याचे नाटक केले. नंतर गंभीर अवस्थेत भाजलेल्या मुलीला स्थानिक लोकांनी रुग्णालयात नेले, मात्र तिचा जीव वाचवता आला नाही. गुरुवारी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर परिसरातील लोक आणि नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला.
दुकानमालकाने आपल्या मिठाई दुकानासमोर उकळते पाणी ठेवले होते. खेळता खेळता साडेचार वर्षांची मुलगी चुकून तेथे पडली. मुलीचे वडील अर्णब हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. दुकानात एवढी जागा असूनही दुकानदाराने उकळत्या पाण्याचे भांडे बाहेर ठेवल्याने ही दुर्घटना घडल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी केली आहे. संतापजनक बाब म्हणजे, उकळत्या पाण्यात पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी दुकानातील कोणीही पुढे आले नाही. मुलगी पडल्याचे पाहून दुकानदाराने तिला उचलण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बराच वेळ उकळत्या पाण्यात राहिल्याने मुलगी गंभीररित्या भाजली.
पाच दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू
31 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता तीन मुले उद्यानासमोर खेळत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ती मुलगी अचानक त्या मिठाईच्या दुकानातील भांड्यात भरलेल्या उकळत्या पाण्यात पडली. तिला सुरुवातीला तामलुक जिल्हा रुग्णालयात आणि नंतर कोलकाता येथील पीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 जानेवारीच्या रात्री मुलीचा मृत्यू झाला. तिच्यावर मागील पाच दिवस उपचार सुरू होते. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.