डॉक्टर वडील लटकलेले, तर आईचा मृतदेह बेडवर; घरात जाताच MBBS विद्यार्थ्याला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:43 PM2024-01-21T12:43:55+5:302024-01-21T12:46:21+5:30
आई-वडिलांचे मृतदेह पाहून मुलाला मोठा धक्का बसला. त्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पेशाने डॉक्टर असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये सक्रिय असलेल्या पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील बीना परिसरात ही घटना घडली आहे. डॉ. बलबीर कॅथोरिया आणि डॉ. मंजू कॅथोरिया अशी मृत्यू पती-पत्नीचे नावे आहेत. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही आढळली असून कर्जातून नैराश्य आल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बलबीर कॅथोरिया आणि डॉ. मंजू कॅथोरिया यांचा मुलगा पाटणा येथे शिक्षणासाठी वास्तव्यास होता. तेथून घरी आल्यानंतर घरात त्याला आपले वडील लटकलेल्या अवस्थेत आढळले. तसंच आईदेखील बेडवर मृतावस्थेत आढळून आली. आई-वडिलांचे मृतदेह पाहून मुलाला मोठा धक्का बसला. त्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृत दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
डॉ. बलबीर कॅथोरिया सार्वजनिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते, तर त्यांची पत्नी स्त्री-रोग स्पेशालिस्ट म्हणून काम पाहात होती. त्यांच्या सूचनेनुसार नुकतंच शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू झाली होती.
३ वर्षांपूर्वी मुलीनेही संपवलं होतं जीवन
कॅथोरिया दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मात्र त्यांच्या मुलीने तीन वर्षांपूर्वी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली होती. अभ्यासाच्या दबावातून तिने हे पाऊल उचललं होतं. तसंच त्यांचा मुलगा हा पाटणा इथं एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री त्याचं आपल्या आई-वडिलांशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यानंतर तो त्यांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशातील आपल्या घरी निघाला. मात्र घरी पोहोचण्याआधीच सगळं सपलं होतं. आपल्या आई-वडिलांचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर ओढावली.