नवी दिल्ली : दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये दोन अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे नाव आबिद हुसैन आणि मोहम्मद ताहिर आहे. संरक्षण विभागाशी संबंधित कागदपत्रे स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक म्हणजे त्यांनी आयुक्तालयामध्ये असून आयएसआययापाकिस्तानी एजन्सीसाठी काम करत असल्याचे सांगितले आहे.
दोन्ही आयएसआय एजन्ट पाकिस्तानी उच्चायोगामध्ये व्हिसा विभागामध्ये ते काम करतात. सुरुवातीला त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना आधार कार्ड दाखवत भारतीय नागरिक असल्याचे भासविले. मात्र, चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर त्यांनी पाकिस्तानी उच्चायोगाचे कर्मचारी असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी आयएसआय या पाकिस्तानी एजन्सीसाठी काम करत असल्याचे कबुल केले.
आबिद हुसैन हा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रहिवासी आहे. तर मोहम्मद ताहिर हा इस्लामाबादचा आहे. दोघेही दिल्लीच्या रस्त्यांवर खुलेआम फिरत असत. तसेच हेरगिरी करत होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना प्रतिबंधित व्यक्ती ठरविले असून २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
धक्कादायक म्हणजे या दोन्ही आयएसआय एजंट भारत सरकारच्या कर्मचाऱ्याकडून आमिष दाखवत सुरक्षेसंबंधी कागदपत्रे घेत होते. याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचला. यावेळी त्यांना या कर्मचाऱ्याला कागदपत्रांच्या बदल्यात पैसे आणि आयफोन भेट देत असताना रंगेहाथ पकडले.