ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - गेल्या अनेक दिवसांपासून भारत-पाक सीमेवर तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असून, भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी लष्कराकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या विटंबनेचे अनेक प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे जवानांच्या कुटुंबीयांच्याही भावना तीव्र आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराकडून भारतीय जवानांवर सातत्यानं होणा-या हल्ल्यांवरून एका निवृत्त जवानाच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं आहे. निवृत्त जवानाच्या पत्नीने चक्क 56 इंचाचा ब्लाऊज मोदींना भेट स्वरुपात पाठवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी 56 इंच छातीचा उल्लेख केला होता. भाजपा सरकार सत्तेवर आल्यास पाकिस्तान घाबरून हल्ले करणे थांबवेल, असंही मोदीही त्यावेळी म्हणाले होते. तोच धागा पकडत निवृत्त जवान धरमवीर सिंग यांच्या पत्नी सुमन सिंग यांनी मोदींनाच टार्गेट केलं आहे. हरियाणातल्या फतेहबादमध्ये राहणा-या निवृत्त जवान धरमवीर सिंग यांच्या पत्नीनं पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्या पत्रासोबच 56 इंचाचा ब्लाऊज भेट स्वरूपात पाठवला आहे. त्यांनी पत्रातून भाजपानं लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करून दिली आहे. सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांकडून जवानांवर सातत्यानं हल्ले होत आहे. शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना होत असल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेल्याचंही सुमन सिंग यांनी पत्रातून मोदींना सांगितले आहे. निवृत्त जवान धरमवीर सिंग यांच्या पत्नी सुमन सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारणाऱ्या या पत्रात म्हटले आहे की, भाजपा सत्तेत आल्यास पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी म्हणाले होते. मात्र सध्या चित्र वेगळं असून, परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. महिला त्यांच्या मुलांना, भावांना आणि पतीला जवळच्या व्यक्तीचा शिरच्छेद व्हावा म्हणून नव्हे, तर देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवतात. आता कुठे गेली तुमची 56 इंचाची छाती, असा प्रश्नही पत्रातून विचारण्यात आला आहे. पंतप्रधानांनी जवानांना सीमेवर कारवाई करण्याची परवानगी द्यायला हवी. आपल्या जवानांचे हात बांधले गेलेले आहेत, हे दुर्दैवी असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
धक्कादायक! जवानाच्या पत्नीनं मोदींना 56 इंचाचा "ब्लाऊज" दिला भेट
By admin | Published: May 14, 2017 6:56 AM