ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांवर व मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीशांवर आरोप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कन्नन यांच्याविरोधात सुर्पीम कोर्टाने न्याययंत्रणेचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे. हायकोर्ट जज विरोधात अशी नोटीस बजावल्याची ही पहिलीच वेळ आहे.
कन्नन हे कोलकाता हायकोर्टात न्यायाधीश आहेत. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांवरोधात तसेच मद्रास उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांवरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. इंडियन एक्सप्रेसने यांसदर्भात वृत्त दिले आहे. याप्रकरणी सरन्यायाधीश अध्यक्षस्थानी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय खंडपीठाने कन्नन यांच्याविरोधात पुढाकार घेत अवमान केल्याची नोटी बजावली आहे, त्यांना 13 फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, तसेच त्यांना न्यायालयीन अथवा प्रशासकीय काम देण्यात येऊ नये असा आदेशही देण्यात आला आहे.
न्याययंत्रणेवर हल्ला करणाऱ्या कन्नन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने कठोर कारवाई करून चांगला पायंडा पाडावा अशी मागणी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी आज केली आहे.
न्यायाधीश कन्नन हे याआधीही अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आवश्यकता नसताना कोर्टाच्या फायली जवळ बाळगणे, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश न पाळणे, सरकारी घर रिकामे न करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर याआधीही करण्यात आले आहेत.
मात्र, न्याययंत्रणेचा अवमान केल्याचा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर ठेवण्यात आलेला ठपका ही भारताच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे.