गुवाहाटी- आसामच्या फकरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ तासांत तब्बल ८ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार रात्रीपासून हा प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे. दोन ते चार दिवसांची पाच नवजात अर्भक बुधवारी रात्री दगावली होती. तर इतर तीन जणांचा गुरुवारी मृत्यू झाला. पण आश्चर्याची बाब म्हणजे एकाच हॉस्पिटलमध्ये इतक्या मोठ्या संख्येने नवजात अर्भकांचा मृत्यू होऊनही हॉस्पिटल प्रशासनाने याची जबाबदारी झटकली आहे. हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरांची आणि हॉस्पिटलमधील स्टाफची बाजू घेत यात त्यांच्याकडून दृर्लक्ष किंवा चूक न झाल्याचं म्हटलं आहे. बाळ जन्मला आल्यावर त्याचं वजन कमी असल्याने मृत्यू झाला, असं कारण हॉस्पिटल प्रशासनाने दिलं आहे.
बाळाचं जन्मावेळी वजन कमी असणं हे त्याच्या मृत्यूमागील महत्वाचं कारण असतं. या आठ नवजात अर्भकांच्या मृ्त्यूंमागेही हेच कारण असून त्यात डॉक्टरांचा दोष नाही. मृत्यू झालेल्या सर्व मुलांना नवजात गर्भधारणा देखभाल युनिट (एनआयसीयू) मध्ये ठेवण्यात आलं होतं. यातील काही बालकांचं वजन अडीच किलो इतकं होतं. तर एका बाळाचं वजन हे फक्त एक किलो इतकं होतं, असं या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तसंच हॉस्पिटलचे मुख्य अधीक्षक डॉ. दिलीप कुमार दत्ता यांनी सांगितले आहे.
हॉस्पिटलमध्ये दररोज याच कारणामुळे एक ते दोन नवजात अर्भकांचे मृत्यू होतच असतात, असं ही दत्ता यांनी सांगितलं. बुधवारी आणि गुरुवारी या संख्येत वाढ झाल्याने याची चर्चा होत आहे. त्याचबरोबर राज्याच्या आरोग्यमंत्री हिमंता बिस्वास शर्मा यांनी या घटनेची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तसंच वैद्यकीय शिक्षण संचालकांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी 30 मुलांचा मृत्यू झाला होता. सगळ्यांनाच हादरविणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आसाममधील या घटनेची चर्चा सुरू आहे.