धक्कादायक! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची गेली दृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 05:25 AM2019-08-18T05:25:58+5:302019-08-18T05:30:02+5:30
प्रशासनाकडून रेडक्रॉस निधीतून प्रत्येकी २0 हजार रुपये, तर सरकारकडून ५0 हजार रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे.
इंदूर (मध्य प्रदेश) : अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ११ रुग्णांची दृष्टी गेल्याची घटना येथे घडली. राज्य सरकारने कठोर कारवाई करीत रुग्णालयाचा परवाना रद्द केला असून आॅपरेशन थिएटर सील केले आहे.
दृष्टी गमवावी लागलेल्या रुग्णांवर टी. थोईथराम रुग्णालयात सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत. पीडित रुग्णांना जिल्हा प्रशासनाकडून रेडक्रॉस निधीतून प्रत्येकी २0 हजार रुपये, तर सरकारकडून ५0 हजार रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. २0१0 मध्येही याच रुग्णालयात १८ रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली होती.
८ आॅगस्ट रोजी इंदौर आय हॉस्पिटलमध्ये अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या डोळ््यात औषध टाकण्यात आले. त्यातून संसर्ग होऊन रुग्णांची दृष्टी गेली. तेथील डॉक्टरांनी दहा दिवसांपर्यंत रुग्णांवर उपचार गेले. तथापि, त्यांची दृष्टी परत आली नाही.
राज्याच्या आरोग्यमंत्री तुलसी सिलावट यांनी सात सदस्यीय समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या समितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, सीएमएचओ आणि दोन नेत्रतज्ञ यांचा समावेश आहे.
२0१0 मध्ये या रुग्णालयात १८ लोकांना दृष्टी गमवावी लागली होती. तत्कालिन सीएमएचओ डॉ. शरद पंडित यांनी हलगर्जीपणा करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची शिफारस केली होती. २0११ मध्ये रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व शिबिरांवर बंदी घालण्यात आली होती. शिबिराच्या आयोजनासाठी सीएमएचओच्या अनुमतीचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र हे प्रतिबंध थोडे दिवसच लागू राहिले. नंतर हे आदेश शिथील झाले.