हैदराबाद : सौदी अरेबियाच्या ६५० किलोमीटर लांबीपर्यंत पसरलेल्या ‘रब अल खली’ या वाळवंटात हरवल्याने तेलंगणातील २७ वर्षीय तरुणाचा आपल्या सुदानी सहकाऱ्यासह अन्न-पाण्याविना मृत्यू झाला.
तेलंगणातील करीमनगरचा रहिवासी मोहंमद शेहजाद खान तीन वर्षांपासून सौदीतील दूरसंचार कंपनीत काम करत होता. जगातील सर्वात धोकादायक वाळवंटापैकी एक असलेल्या ‘रब अल खली’ या वाळवंटाच्या एका भागात तो रस्ता चुकला. त्याच्याबरोबर सुदान देशाचा एक सहकारी होता. जीपीएस यंत्रणा बंद पडल्यामुळे त्यांना वाळवंटात वाट सापडली नाही. त्यातच त्यांच्या मोबाइल फोनची बॅटरीचे चार्जिंगही संपले. त्यामुळे ते कोणालाही मदतीला बोलवू शकले नाहीत. त्यांच्या वाहनातील पेट्रोल संपल्यानंतर तर त्यांचे सर्व मार्गच खुंटले.
अन्न-पाण्याविना त्यांचा जीव कासावीस झाला. भीषण ऊन, गर्मीत अन्न पाण्याविना तग धरण्याची त्यांची धडपड अखेर शांत झाली. मृत्यूनेच त्यांची सुटका झाली. चार दिवसांनी त्यांचे मृतदेह वाहनाजवळ सापडले.