नवी दिल्ली - देशातील बेरोजगारीच्या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं सांगण्यात येत. विशेष म्हणजे कोरोनामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे, नोकरीच्या 100 जागांसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येतात. त्यात, सरकारी नोकरी असेल तर ही संख्या आणखी वाढते. एमपीएससी परीक्षेच्या 300 ते 400 जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या 3 ते 4 लाखांच्या घरात असते. त्यामुळे, रोजगार ही मोठी समस्या बनली आहे. मात्र, संसदेत पेन्शनमंत्री जितेंद्रसिंह यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागातील एकूण रिक्त पदांची संख्या 8.72 लाख एवढी आहे. केंद्र सरकारच्या सर्वच विभागातील मंजूर पदांची संख्या 40 लाख 4 हजार 941 एवढी आहे. त्यामध्ये, 31 लाख 32 हजार 698 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे, रिक्त पदांची संख्या 8 लाख 72 हजार 243, एवढी असल्याचे सिंह यांनी राज्यसभेत सांगितले. विशेष म्हणजे ही आकडेवारी मार्च 2020 पर्यंतची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंत्री सिंह यांनी 3 प्रमुख भरती एजन्सीद्वारे गेल्या 5 वर्षात करण्यात आलेल्या भरतींची आकडेवारी देण्यात आली. त्यानुसार, 2016-17 ते 2020-21 या कालावधीत युपीएससी 25,267 उमेदवारांची भरती केली आहे, तर स्टाफ सिलेक्शन कमिशनने 2 लाख 14, 601 उमेदवारांची भरती केली आणि रेल्वे बोर्डाने 2 लाख 4,945 उमेदवार भरती केले आहेत.