अहमदाबाद- गुजरातमध्ये सध्या जोरदार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतायत. काँग्रेस आणि भाजपाकडून जागोजागी सभा घेतल्या जात आहेत. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही सभा घेतली होती. त्या सभेत चक्क शहिदाच्या मुलीसोबतच गैरवर्तन करण्यात आलं आहे.नर्मदा जिल्ह्यात गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सभेला संबोधित करत होते. त्याच वेळी एक मुलगी हातात कागद घेऊन मंचाच्या दिशेनं जात होती. परंतु मंचावर जाण्यापासून तिला सुरक्षारक्षकांनी रोखलं. त्यावेळी तिनं मी शहिदाची मुलगी आहे. मला मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भेटायचं आहे, असं सांगितलं. परंतु महिला पोलिसांनी तिला जमिनीवर पाडून जबरदस्त मारहाण केली आहे. पोलिसांनी तिचं काहीही न ऐकता महिला पोलिसांकरवी तिला धक्के मारत सभेबाहेर हाकलून दिलं. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं की सोडून दिलं याचा अद्याप उलगडा झालेला नाही. परंतु गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सभेत हा गैरप्रकार झाल्यामुळे सर्वच स्तरातून याचा निषेध केला जातोय. विशेष म्हणजे त्यावेळी मंचावर मुख्यमंत्री विजय रुपाणी स्वतः भाषण ठोकत होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी याचा ट्विटरवर यासंदर्भात एक व्हिडीओही शेअर केला आहे. देशभक्त रुपाणीजींनी शहिदाच्या मुलीला सभेच्या बाहेर हाकलवून मानवतेला लाजवेल, असं कृत्य केलं आहे. 15 वर्षांपासून त्या शहिदाच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नाही. फक्त पोकळ आश्वासनं दिली आहेत. न्याय मागणा-या या मुलीला आज अपमानही मिळाला, भाजपावाल्यांनो, जरा लाज बाळगा, राहुल गांधींनी ट्विट करत भाजपावर शरसंधान साधलं आहे.
धक्कादायक! गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेतच शहिदाच्या मुलीला धक्के मारत दाखवला बाहेरचा रस्ता
By वैभव देसाई | Published: December 01, 2017 8:34 PM