लेह : जम्मू-काश्मीरच्या लेह जिल्ह्यामध्ये भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी बंद पाकिटात लाच दिल्याचा धक्कादायक आरोप तेथील पत्रकारांनी केला आहे.
एका स्थानिक पत्रकाराने सांगितले की, 2 मे रोजी भाजपाचे राज्य प्रमुख रविंद्र रैना यांनी लडाखच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांना बंद लिफाफे देण्यात आले आणि सभागृहाबाहेर गेल्यानंतर ते खोलण्यास सांगण्यात आले. मात्र, संशय आल्याने मी लिफाफा उघडला. तर आतमध्ये 500 च्या नोटा दिसल्या. तेव्हाच भाजपाच्या नेत्यांना बोलावून पाकिट परत दिले. मात्र, त्यांनी परत घेण्यास नकार दिला.
ही बंद पाकिटे रैना तेथे असतानाच भाजपाचे नेते विक्रम रंधवा यांनी पत्रकाराममध्ये वितरित केले. या प्रकरणी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यता आल्याचेही या पत्रकाराने सांगितले.
या प्रकरणी लेहच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता अवनी लवासा यांनी सांगितले की, तक्रार पोलिसांकडे पाठविली आहे. यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला आहे.
मंगळवारी एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये भाजपा नेते पत्रकारांना बंद लिफाफ्यांचे वाटप करत असल्याचे दिसत होते. ही बाब लवासा यांनीही अधोरेखित केली आहे. हा व्हीडिओ हॉटेल सिंगेज पॅलेसमधील आहे.
भाजपाकडून आरोप फेटाळलेभाजपाने पत्रकारांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. उलट या पत्रकारांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली आहे. रैना यांनी सांगितले की, प्रेस क्लबविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. तर अन्य एका भाजपा नेत्याने सांगितले की, पक्षाकडून निर्मला सितारमन यांच्या रॅलीला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्रिका देण्यात येत होती. लडाखमध्ये 6 मे रोजी मतदान पार पडले आहे.