नवी दिल्ली, दि. 18 - एका दलित महिलेनं केवळ काम करण्यास नकार दिला म्हणून उच्च जातीतील बाप-लेकानं मिळून चक्क तिचं नाक कापल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. इतकंच नाही तर या महिलेसह तिच्या पतीला अमानुष मारहाणही करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रेंवझा गावात ही घटना घडली आहे.
सुरखी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आर.एस.बागरी यांनी सांगितले की, सोमवारी नरेंद्र सिंह (वय 32 वर्ष) आणि त्याचे वडील साहेब सिंहनं राघवेंद्र धानक (वय 40 वर्ष) आणि त्यांची पत्नी जानकी यांना आपल्या घरी येऊन काम करण्यास सांगितले होते. मात्र, राघवेंद्र यांनी काम करण्यास नकार दिला. राघवेंद्र यांनी काम करण्यास नकार दिला म्हणून बापलेक भडकले आणि दोघांनाही शिवीगाळ करत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
बागरी यांनी सांगितले की, जेव्हा जानकी आपल्या जखमी पतीस हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती त्यावेळी नरेंद्र आणि साहेबनं तिला रस्त्यात गाठलं व तिचं नाक कापल्याची कथित माहिती समोर आली. दरम्यान, जेव्हा पीडित महिलेनं मध्य प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्ष लता वानखेडे यांच्यासमोर हे प्रकरण मांडत आरोपींना शिक्षा करण्याची मागणी केली त्यावेळी हा धक्कादायक व गंभीर प्रकार समोर आला.
महिला आयोगाच्या खंडपीठासमोर जानकीनं तिला झालेली मारहाण तसंच नाक कापल्याची ही घटना मांडली. या प्रकरणी दलित आणि आर्थिक स्वरुपात कमकुवत असलेल्या कुटुंबाच्या तक्रारीची महिला आयोगाच्या अध्यक्षानं गांर्भीयानं दखल घेतली आहे. शिवाय पोलिसांनादेखील कारवाईचे आदेश दिले सांगितले आहे की, आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. मिळालेल्या आदेशानुसार व पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही केली आहे.