भारताचा शेजारी देश नेपाळच्या समाजकंटकांनी भारतीय सीमेमध्ये घुसून वनविभागावर हल्ले केले आहेत. धर्मापूर रेंजच्या पाच चौक्यांना आग लावण्यात आली आहे.
धर्मापूरच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी याबाबतची पुष्टी केली असून उद्या वनविभागाचे कार्यालय उघडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.
नोव्हेंबरमध्ये नेपाळी नागरिकांनी शीसम या लाकडाची दोन झाडे तोडली होती. तेव्हा १० लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोणीही सापडला नव्हता. शनिवारी धर्मापूर रेंजच्या वन क्षेत्राधिकाऱ्यांनी एका संशयित नेपाळी नागरिकाला ताब्यात घेतले होते. त्याला रात्री सोडून देण्यात आले होते. मात्र, याचा राग आलेल्या नेपाळी नागरिकांनी काही चौक्यांना आगी लावल्या, असे कतर्नियाघाटचे वनाधिकारी बी शिव शंकर यांनी सांगितले.
कतर्नियाघाट जंगलाचा ४५ किमीचा पट्टा नेपाळच्या सीमेला लागून आहे. तर पूर्ण बहराइच जंगल ७० किमीच्या सीमेवर आहे. नेपाळ हा भारताचा मित्र असल्याने सर्व सीमा खुली आहे. यामुळे या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. या लोकांना रोखण्यासाठी कतर्नियाघाटच्या सीमावर्ती भागात सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या १६ चौक्या बनविण्यात आल्या आहेत. तर पूर्ण सीमेवर २३ चौक्या आहेत. तरीही नेपाळी भारतीय सीमेत घुसून वनविभागाच्या चौक्यांना आगी लावत आहेत. चौक्यांना आग लावल्यामुळे या उष्णतेच्या दिवसांत जंगलाला आग लागण्याची शक्यता होती.