ऑनलाइन लोकमत
वारंगल (तेलंगण), दि. 3 - रुग्णालयाने मृत म्हणून घोषित केलेलं मूल अंत्यसंस्काराच्या आधी जिवंत असल्याचं लक्षात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणमधील वारंगल जिल्ह्यातही धक्कादायक घटना घडली आहे. एमजीएम रुग्णालयाने बाळाला जन्म झाल्यानंतर लगेचच मृत घोषित केलं होतं.
रुग्णालयाने बाळ मृत असल्याचं सांगत कुटुंबाच्या हवाली केलं. यानंतर कुटुंबियांनी नवजात बाळाच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. पण अचानक त्यांना बाळाच्या शरिरात हालचाल होत असल्याचं लक्षात आलं. त्यांना तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात बाळावर उपचार करण्यात आले, मात्र ते वाचू शकलं नाही.
रुग्णालयाच्या बेजबाबदरपणामुळे नुकताच जन्म झालेल्या बाळाचं आयुष्य सुरु होण्याआधीच संपलं. रुग्णालयातील डॉक्टरांनीही सकाळी ईसीजी मशिन्स काम करत नव्हत्या असं बेजबाबदार उत्तर दिलं आहे.
गेल्या महिन्यातही अशाच प्रकारची बेजबाबदार आणि धक्कादायक घटना समोर आली होती. दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात एका महिलेची 22 व्या आठवड्यातच प्रसूती झाली होती. बाळाचं वजन 460 ग्राम इतकं भरलं होतं. डॉक्टर आणि नर्सने बाळाचा मृत्यू झाल्याचं कुटुंबाला सांगितलं.
बाळाचे वडिल रोहित यांनी सांगितलं की, "डॉक्टर आणि नर्सनी बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगत त्याला एक पॅकेटमध्ये सील करुन दिलं. त्यावर लेबलही लावण्यात आला होता. मात्र जेव्हा आम्ही अंत्यसंस्कारासाठी बाळाला घेऊन गेलो तेव्हा माझ्या बहिणीने पॅकेटमध्ये काहीतरी हालचाल होत असल्याचं पाहिजे. आम्ही पाहिलं तर बाळ जिवंत होतं".