धक्कादायक ऑफर... खरेदीनंतर 24 तासांत कोरोना झाल्यास 50 हजारांचा कॅशबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 10:52 AM2020-08-20T10:52:21+5:302020-08-20T10:53:16+5:30
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विक्रेते अनेक ऑफर्स देतात. सध्या कोरोना काळात केरळमधील अशाच एका ऑफर्सच्या जाहिरातीची चर्चा आहे. येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून शॉपिंगनंतर 24 तासांत कोरोना झाल्यास 50 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे.
कोची - केरळमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानमालकाने धक्कादायक ऑफरची जाहिरात केली आहे. या जाहिरातीनुसार दुकानातून शॉपिंग करणाऱ्या ग्राहकाला 24 तासांत कोरोनाची बाधा झाल्यास 50 हजार रुपयांचा कॅशबॅक देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या 50 हजार रुपयांच्या कॅशबॅकवरुन जीएसटीचीही सुट देण्यात आली आहे. या धक्कादायक ऑफरच्या जाहिरातीनंतर दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी एका वकिलाने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी विक्रेते अनेक ऑफर्स देतात. सध्या कोरोना काळात केरळमधील अशाच एका ऑफर्सच्या जाहिरातीची चर्चा आहे. येथील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून शॉपिंगनंतर 24 तासांत कोरोना झाल्यास 50 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे. या वादग्रस्त जाहिरातीमुळे दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्याने दुकानावर कारवाई करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. केरळमध्ये (kerala) इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या एका दुकानाने अशी विचित्र ऑफर 15 ते 30 ऑगस्टसाठी ही ऑफर ठेवण्यात आली आहे. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल प्लॅटफॉर्मवरही याची जाहिरात देण्यात आली आहे. या वादग्रस्त जाहिरातीवर आक्षेप घेत एका वकिलाने याविरोधात याचिका दाखल केली. वकिल बिनू पुलिक्काक्कांदम यांनी जाहिराताविरोधात याचिका केली आहे. कॅशबॅकच्या ऑफरमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णदेखील आपला आजार लपवून दुकानात खरेदीसाठी जाऊ शकतात आणि नंतर आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दाखवून कॅशबॅक मागू शकतात ही जाहिरात बेकायदेशीर आणि दंडनीय असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.
“ज्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही, असे कोरोना रुग्ण पैसे मिळवण्यासाठी दुकानात जाऊ शकतात. संसर्गजन्य असा आजार जाणीवपूर्वक पसरवला जातो आहे. आपल्या फायद्यासाठी व्यावसायिक आपली सामाजिक जबाबदारी विसरत आहेत. आयपीसी कलम 269, माहिती तंत्रज्ञान कायदा 2020, ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील कलम 89 आणि केरळ महापालिका कायद्यातील आरोग्य नियमांचं हे उल्लंघन आहे. त्यांनी गंभीर असा गुन्हा केला आहे”, असे या याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी एका वकिलाने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, या दुकानदाराच्या तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. तर, पोलिसांनी चौकशीही सुरु केली आहे.