ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.12 - 90 वर्षांचे एक वयोवृद्ध गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या मृत पत्नीला जिवंत समजून त्यांच्या मृतदेहासोबत राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोविंद राम जेठानी, असे या व्यक्तीचे नाव असून, नवी दिल्लीतील कालकाजी हाऊस परिसरातील ही घटना घडली आहे. गोविंद यांच्या पत्नी गोपी यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जमिनीवर पडलेला पोलिसांना आढळला.
रविवारी रात्री, जेठानी त्यांच्या शेजारी राहणारे वकील प्रमोद यांच्या घरी गेले आणि 'गेल्या काही दिवसांपासून आपली पत्नी आपल्यासोबत बोलत नाही', असे सांगितले. तेव्हा, नेमके काय झाले आहे, हे पाहण्यासाठी प्रमोद त्यांच्यासोबत घरी गेले असता, त्यांना जेठानींच्या पत्नीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था पाहून गोपी यांचा मृत्यू ब-याच दिवसांआधी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी जेठानी यांच्या नातेवाईकांनी गोपी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद राम जेठानी हे मनोरुग्ण असल्याने त्यांना मृत आणि जीवंत व्यक्तीमधील फरक समजू शकला नाही. तसेच त्यांची उपासमारही झाल्याचे समोर आल्याने उपचारांसाठी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जेठानींच्या शेजा-यांनी दिलेल्या माहिती नुसार, अपत्य नसलेले हे दाम्पत्य कधीही शेजा-यांशी बोलत नसत. त्यांची आर्थिक परिस्थितीदेखील हलाखीची होती. त्यांच्या पाच भावांपैकी दोघांचा खासगी व्यापार होता. नातेवाईकांपैकी जेठानी फक्त त्यांचा पुतण्या नरेंद्र यांच्या संपर्कात होते.