इंदौर - इंदौरमधील महाराजा यशवंतराव रुग्णालयातील एक खेदजनक प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णालयात दाखल असलेल्या दोन रुग्णांना एकाच स्ट्रेचरवरुन एक्स रे विभागात नेण्यात आले. विशेष म्हणजे याचा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे. या व्हिडीत महिला आणि पुरुष रुग्णास एकत्रितपणे एकाच स्ट्रेचरवरुन एक्स रे काढण्यासाठी नेण्यात येत आहे. रुग्णांच्या या अहवेलनेमुळे नातेवाईंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संगिता नामक महिला 12 दिवसांपूर्वी एका दुर्घटनेत जखमी झाली होती. त्यावेळी संगिताला उजव्या पायाला फ्रॅक्चर करण्यात आले. रुग्णालयातील ऑर्थोपिडीक विभागातील एका वॉर्डमध्ये संगिता यांना दाखल करण्यात आले. मात्र, एक्स रे काढण्यासाठी संगिता यांना एक्स रे विभागात नेण्यात आले. त्यावेळी, रुग्णालयात स्ट्रेचरची संख्या कमी असल्याने दोन रुग्णांना एकाच स्ट्रेचरवरुन न्यावे लागेल, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यानुसार, एकाच स्ट्रेचरवरुन महिला आणि पुरुष रुग्णाला एक्स रे काढण्यासाठी ने-आण केल्याचे संगिताचे पती धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. तसेच, डॉक्टरांनी त्यांच्या वेळेनुसार यायचे बजावले होते. त्यामुळे, पर्याय नसल्याने तसं जाणं भाग पडल्याचंही धर्मेंद्र यांनी सांगितले.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर रुग्णालयाचे अधिक्षक पीएस. ठाकूर यांनी रुग्णालयातील नर्सेससह वॉर्ड बॉयला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. तसेच, दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. तर, रुग्णालयात स्ट्रेचर किंवा इतर कुठल्याही सोयी सुविधांची कमतरता नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू आहे.