बदायू : वाहनचालकांची तपासणी करताना पोलीस बंदूक असली तरीही ती कधी कोणावर रोखत नाहीत. काही संशयित हालचाली दिसल्या किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली तरच बंदुकीचा वापर केला जातो. मात्र, बदायुमध्ये दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना थांबविण्यासाठी आणि कागदपत्र तपासणीवेळी दोन दोन पोलिस बंदूक रोखून असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये नेहमीच्या तपासणीवेळी पोलिस दिवसाढवळ्या दुचाकीस्वारांना थांबवत असून त्यांच्याकडून नेहमी प्रमाणे लायसन, कागदपत्रे मागत आहेत. मात्र, याचवेळी दुचाकीस्वारावर एक इन्स्पेक्टर पिस्तूल आणि हवालदार रायफल रोखून धरत असल्याचे दिसत आहे. तसेच या दुचाकीस्वारांना हात वर करण्यास सांगत असल्याचे यामध्ये दिसत आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये हे काय सुरू आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.