ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. 21 - मध्य प्रदेशमध्ये जोरदार पावसानं आलेल्या पुरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून पुरामुळे लोकांना घराबाहेर दिवस काढावे लागता आहेत. मात्र या पुराची झळ फक्त मध्य प्रदेशमधील जनतेलाच नव्हे तर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानांनाही बसली आहे.
पन्ना जिल्ह्यात पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पुरातून जाणे अशक्य झाल्यानं पोलिसांनी त्यांना पाण्यातून चक्क उचलून नेलं आहे. पूरग्रस्त गावांचा दौरा करणा-या मुख्यमंत्र्यांना दुथडी भरुन वाहणारी नदी पार करण्यासाठी पोलिसांची अशा प्रकारे मदत घ्यावी लागली आहे. शिवराजसिंह यांना उचलून घेतलेला फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आलेल्या पुराची व्याप्ती लक्षात येते आहे. उत्तर भारतातील चार मोठ्या राज्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
अनेक जिल्ह्यांना पुरानं वेढलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पुरासंदर्भात अऩेक विदारक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारनं पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी, अशी भावना जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.