सिद्धार्थनगर- उत्तर प्रदेशमधल्या सिद्धार्थनगरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सिद्धार्थनगरमधल्या चिल्हिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सहा वर्षांच्या निरागस मुलीवर अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला. ती चिमुकली रात्री मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर गेली असता तिच्यावर हा प्रसंग ओढावला.सहा वर्षांच्या या चिमुकलीवर गावातीलच एका व्यक्तीनं बलात्कार केला. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली. तर गेल्या काही दिवसांपूर्वीही उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या सिव्हिल लाइन परिसरात एका महिलेवर सतत दोन महिने दोघांनी आळीपाळीनं बलात्कार केल्याचाही प्रकार उघडकीस आला होता. 23 वर्षांच्या महिलेवर दोन महिने सातत्यानं दोघांनी सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात त्या पीडितेनं स्वतःचे काका आणि अन्य एका व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असली तरी बलात्काराचे सत्र थांबण्यास तयार नाही. उत्तर प्रदेशातील इटा येथे सोमवारी एका विवाह सोहळ्यास पालकांसह गेलेल्या सात वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी 19 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
बलात्कारांत वाढ भारतात पंधरा मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणात २०१५ पेक्षा २०१६मध्ये ८२ टक्के वाढ झाली. अत्याचार होण्याचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात आहे. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी १५ टक्के गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये घडतात. गुजरातमधील सुरतमध्येही ११ दिवसांपूर्वी एका बालिकेचा मृतदेह मिळाला होता. तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. अद्याप तिची ओळख पटलेली नाही.