अहमदाबाद : अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे हिंदू व मुस्लिम, असे धर्माच्या आधारे वर्गीकरण करून त्यांची व्यवस्था स्वतंत्र वॉर्डांमध्ये करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अलीकडेच विस्तारीकरण करून एक नवी स्वतंत्र विंग जोडण्यात आली. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर ही संपूर्ण विंग फक्त कोरोनाग्रस्तांसाठी म्हणून राखून ठेवण्यात आली आहे. ही सोय अहमदाबाद व गांधीनगर या दोन्ही शहरांसाठी एकत्रित आहे. या विंगमध्ये एकूण १,२०० खाटांची सोय आहे. सध्या तेथे एकूण १८६ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी १५० जणांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली असून, इतरांच्या चाचण्यांचे रिपोर्ट यायचे आहेत. संसर्ग झालेल्या १५० रुग्णांपैकी किमान ४० रुग्ण मुस्लिम आहेत. हिंदू व मुस्लिम रुग्णांची व्यवस्था ए-४ व सी-४, अशा स्वतंत्र वॉर्डांत करण्यात आली आहे.
रुग्णांचे वर्गीकरणे असे धर्माच्या आाधारे केल्याची कबुली इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गुणवंत एच. राठोड यांनी दिली. ते म्हणाले की, सर्वसाधारणपणे रुग्णालयांमध्ये पुरुष व महिला रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड असतात; पण आम्ही रुग्णांच्या धर्मानुसार वॉर्ड तयार केले आहेत. असे का केले, असे विचारता त्यांनी सरकारकडून तसे सांगण्यात आल्याचे सांगितले.उपमुख्यमंत्री पटेल व अहमदाबादचे जिल्हाधिकारी के.के. निराला या दोघांनीही आपल्याला याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. निराला म्हणाले, असे वर्गीकरण करण्यास आम्ही सांगितलेले नाही व सरकारकडूनही तसे सांगण्यात आल्याचे मला तरी माहीतनाही. (वृत्तसंस्था)‘गैरसोय टाळण्यासाठी नावानिशी केले वर्गीकरण’च्एका रुग्णाने सांगितले की, ‘‘ए-४ वॉर्डमध्ये दाखल असलेल्या आम्हा २८ रुग्णांना रविवारी रात्री नावानिशी बोलावून आम्हाला दुसऱ्या (सी-४) वॉर्डात हलविण्यात आले. ज्यांना हलविण्यात आले ते सर्व एकाच धर्माचे होते. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना विचारता ‘एकत्र ठेवल्याने तुम्हालाच गैरसोयीचे होऊ नये, म्हणून ही सोय करण्यात आली आहे’, असे तो म्हणाला.