प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपींचा एन्काऊटर करण्यात आला होता. अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर, आता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मीडियाला बाईट देत असतानाच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या दोघांच्या हत्येचा व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्ड झाला असून तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. विशेष म्हणजे आज मुलाच्या दफनविधीसाठीही त्याला नेले नव्हते. आज प्रयागराज येथील रुग्णालयात नेत असताना अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेचा थरात व्हिडिओत कैद झाला असून सोशल मीडियावर अतिक अहमद ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आजच असदच्या सुपूर्द ए-खाक ची रस्म पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता झांसी येथून प्रयागराजला असद व गुलाम यांचे पार्थिव आणण्यात आले होते. त्यानंतर, असदचे शव थेट कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आले. तर, गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. दरम्यान, दोघांच्याही दफनविधीवेळी पल्बीक आणि मीडियाला दूरवरच उभे केले होते. केवळ, जवळच्या २५ नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मुलाच्या दफनविधीसाठीही अतिकला नेण्यात आलं नव्हतं.